लोकलायजेशन व्यावसायिक: जागतिकीकरणाच्या दुनियेतील अनाम वीर

2 months ago 0 Comments

बदल हेच शाश्वत सत्य आहे! लोकलायजेशन व्यवसाय बदल नेमका कसा आहे त्यावर दृष्टिक्षेप… एआय नामक वादळाने लोकलायजेशन व्यावसायिकांना आर्थिक आणि मानसिक स्तरावर पार जेरीस आणले आहे

श्री संजय शहा द्वारे लिखित

सध्या सगळीकडेच एआयची चलती आहे आणि या वावटळीत व्यावसायिक अगदी भरडून निघाले आहेत. लोकलायजेशन क्षेत्रालाही एआयची झळ बसली आहे. तुम्ही लोकलायजेशन व्यावसायिक किंवा भाषांतरकार असाल तर एआयचा चिमटा तुम्हीदेखील अनुभवला असेलच! आर्थिक आणि मानसिक स्तरावर एआयने मनुष्यासमोर गंभीर आव्हान निर्माण केले आहे.

एआयचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रातील झाल्याने लोकलायजेशन ‘फ्री-फॉर-ऑल’ झाले. एआयच्या साथीने आपणही भाषांतर तज्ज्ञ होऊ शकतो असे अनेकांना वाटू लागले. मात्र वास्तव निराळे आहे!

 

भाषांतर (लोकलायजेशन) क्षेत्रात सध्याच्या परिस्थितीचे आकलन करून आमचे सीएमडी संजय शहा यांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख वाचा. एखादा मजकूर आपला मूळ गाभा न गमावता कसा वाचकापर्यंत पोहोचेल यासाठी मेंदू झिजवून एखादा भाषा तज्ज्ञ आपलं कसब पणाला लावत असतो. मात्र मजकुराला प्रसिद्धी मिळाल्यानंतर वर्षानुवर्षे काम करत असलेला हा घटक अनाम वीरच राहतो. सध्याच्या एआय सद्दीत तर न केलेल्या चुकीची शिक्षा तो सहन करतो आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे इतकेच त्याच्या हातात उरले आहे.

 

अविश्वासाचा उदय आणि आरोपाचे वाढते बळी

इथे स्वत:चा आणि भाषांतर करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा अनुभव बराच बोलका ठरतो. आमच्यापैकी बरेच जण सातत्याने अनेक वर्षे भाषा क्षेत्रात कार्यरत असून शब्द आणि लेखनाच्या प्रेमापोटी स्वत:ची कौशल्ये परजत आहेत. भारतात भाषांतर/ अनुवादाच्या कामाला आकर्षक दाम मिळत नसल्याने, बराच काळ हे काम करत राहण्याला नापसंती असते. अशा स्थितीत एआय प्रवेश झाल्याने भाषांतरकाराला कामात वाटत असलेल्या रामाला पूर्णविराम लागण्याची वेळ आली आहे.

त्यातच क्लायंट कोणताही पुरावा न देता, वारंवार भाषांतरकारावर एआयचा वापर करत असल्याचा ठपका ठेवत असल्याने आगीतून सुटून फुफाट्यात पडल्यासारखे वाटते. “ही कॉपी मनुष्यनिर्मित वाटत नाही!” असा शेरा जवळपास प्रत्येक क्लायंटच्या तोंडात असतो. याप्रकरचे शेरे अयोग्यच नाहीत तर भाषांतर करणाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे आहेत. एखादा मजकूर दुसऱ्या भाषेतून स्वभाषेत आणताना भाषांतरकार बराच वेळ खर्ची घालत असतो. मोठ्या प्रयत्नांअंती छापील शब्दांमधील भाव जिवंत करत असतो. मात्र एआयचा वापर करत असल्याचा अयोग्य शिक्का त्याच्या माथी बसतो, ही मेहनती भाषांतरकार/अनुवादकाला लावलेली चपराक आहे.

एआय विरुद्ध मानवी भाषांतर: एक अयोग्य तुलना

होय, एआय भाषांतर करू शकते आणि तेही अनेक भाषांत! मी स्वत: शब्दकोष किंवा सर्च इंजिन म्हणून, स्वत:च्या कामाचा दर्जा उंचावण्याकरिता एआय वापरतो. मात्र एआयकडून मानवी सर्जनशीलतेची अपेक्षा करणे म्हणजे अवास्तव आणि भ्रामक समजूत आहे. एआय मूलभूत, भाषांतर वाटावा असा मजकूर नक्कीच उपलब्ध करून देते. मात्र कठीण भाषा रचनेला सोप्या पद्धतीने खुलवण्याचे सामर्थ्य त्याच्यात नाही. तिथे भाषिक मर्यादा येतात. एआयला शब्दछटांची जाण नसल्याने नेमका अर्थ शब्दांत मांडणे त्याच्याकरिता कठीण आहे.

इंग्रजीतून मराठीत भाषांतर करताना एआय करत असलेल्या गफलतीचे काही नमुने खालीलप्रमाणे:

 

इंग्रजी:

Viewers remain edge on their seats.

एआय:

प्रेक्षकांना आसनाच्या काठावर बसवते.

अपेक्षित अर्थ:

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.

इंग्रजी:

High octone challenges

एआय:

उच्च ऑक्टॉन आव्हाने

अपेक्षित अर्थ:

तीव्र आव्हाने

इंग्रजी:

Keep eye on details

एआय:

तपशीलांवर लक्ष ठेवा.

अपेक्षित अर्थ:

तपशीलांवर करडी नजर ठेवा.

इंग्रजी:

Activity:

एआय:

क्रियाकलाप

अपेक्षित अर्थ:

उपक्रम

इंग्रजी:

Offer:

एआय:

प्रदान

अपेक्षित अर्थ:

उपलब्ध

एआय किंवा मशीन लर्निंग साधनांचा वापर करून केलेले भाषांतर इतके वाईट असते की कॉपी नव्याने लिहावी लागते हाच सूर अन्य भाषिक सहकाऱ्यांसोबत बोलताना उमटतो. थोडक्यात काय तर प्रत्येक भाषेची स्वत:ची अशी एक मजा असते. शब्दांमागे दडलेला अर्थ मांडणे एआयला सध्या तरी शक्य नाही. हे कसब अनेक वर्षे काम करून भाषांतरकारांनी कमावलेले आहे.

 

ठळक मुद्दे:

  • एआयला संकल्पना, संस्कृती, शब्दछटा सविस्तर मांडता येत नाही.
  • शब्दाला शब्द लावणे (अर्थ न समजून घेता) म्हणजे भाषांतर नव्हे!
  • मजकूर इंग्रजीतून इतर भाषांत मांडताना शुद्धलेखनाच्या होणाऱ्या चुका.
  • नेमका अर्थ न हेरता आल्याने होणारे भयंकर भाषांतर.
  • एआय वापरल्यास वेळेची बचत न होता मानवी ऊर्जेची हानी.
  • क्लायंटकडून सातत्याने एआय/ मशीन लर्निंगचा वापर करून भाषांतर केल्याची होत असलेली ओरड व्यावसायिक पद्धतीने वर्षानुवर्षे काम करत असलेल्या भाषांतरकारासाठी मारक, जाचक आणि मानहानीकारक.
  • क्लायंट समाधानी नसल्याने काम गमावण्याची वेळ. नवीन क्लायंट मिळाल्यावरही ते राखण्यात अडथळे.
  • प्रोत्साहनाचा अभाव.
  • आर्थिक तंगी आणि मानसिक त्रास.
  • नीट करून दिलेल्या कॉपीत सतत करावे लागत असलेले बदल आणि त्यामुळे हातात असलेल्या पूर्व-नियोजित असाइनमेंटच्या डेडलाइनवर होणारा परिणाम.

मानवी कौशल्याची जागा एआयला घेता येईल का?

इथे एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल: नजीकच्या काळात एआय एखाद्या दर्जेदार भाषांतरकाराची जागा घेणे अशक्य आहे. एआयकडे सर्जनशीलता, संवेदनशीलता आणि गुणवत्तापूर्ण भाषांतरासाठी लागणारी सांस्कृतिक जाण यांचा अभाव आहे. काव्याला असलेली गेयता नेमकी पकडणे सध्या तरी अशक्य. विनोद, एखादा भावानुवाद आकलून त्याचा अर्थ एआय सांगू शकत नाही. त्यामुळे एआय आणि एआयच्या समर्थकांनो, तूर्तास गप्प बसा!

 

(लेखक स्वत: पत्रकार, लेखक, भाषांतरकार आणि मांगरोळ मल्टीमीडियाचे संस्थापक आणि सीएमडी असून मुंबई-स्थित माध्यम सेवा पुरवठादार आहेत, सुमारे 40 हून अधिक अग्रगण्य भारतीय आणि परदेशी भाषांचे कामकाज त्यांच्या कंपनीमार्फत चालते.)